सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 28, 2023 15:52 IST2023-05-28T15:52:45+5:302023-05-28T15:52:59+5:30
चोरट्यांनी कपाटातील रोख १७ हजार रुपये आणि दोन जोड वाळे, चांदीचे पैंजण, लहान मुलाच्या कानातील १ ग्रॅम सोन्याच्या रिंगा पळवल्या.

सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले
सोलापूर : घराच्या शटर्सचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी झोपलेल्या मुलाच्या डोकीत लोखंडी कटावणी मारून जखमी करीत कपाटातील रोख रककम व चांदीचे दागिने असा सुमारे ३५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
धाडसी चोरीची घटना २८ मे रोजी पहाटे ३.४५ वाजेदरम्यान बार्शी तालुक्यात धसपिंपळगावत घडली. याबाबत जखमी मुलाचे वडील दशरथ गणपत बारंगुळे (वय ५२, रा. धस पिंपळगाव रोड, येडाई विहीर, बार्शी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी कपाटातील रोख १७ हजार रुपये आणि दोन जोड वाळे, चांदीचे पैंजण, लहान मुलाच्या कानातील १ ग्रॅम सोन्याच्या रिंगा पळवल्या.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी दशरथ बारंगुळे व घरातील सर्वजण हे २८ मे रोजी रात्री जेवण आटोपू झोपी गेेले. मुलगा संग्राम हा त्यांच्या बेडरूमध्ये झोपला होता. चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि इतक्यात मुलगा जागा झाला. त्याच्या नजरेस चोरटे पडले. दरम्यान चोरट्यांनी मुलाच्या डोकीत कटावणीने मारुन जखमी केले आणि मुलाने जोरात ओरडले. दरम्यान चोरटे कटावणी टाकून ऐवज घेऊन पसार झाले. त्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले आणि त्याच्या बेडरुममध्ये धाव घेतली. त्याच्या डोकीतून रक्त वाहत असल्याचे दिसले. त्याच्याकडे चौकशी करताच घडलेला प्रकार सांगितला. बेडरूमध्ये पहाणी करताना लोखंडी कटावणी आढळली. कपाटातील साहित्यही खाली पडलेले दिसले.