आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सीना व भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वंदे भारत सिद्धेश्वर एक्सप्रेस सह अन्य रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, रेल्वे रुळावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विजापूरकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होटगी स्टेशनवर थांबविल्या आहेत, पुढे सिग्नल मिळत नसल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील तीन ते चार तास रेल्वे सेवा सुरू होण्यासंदर्भात अधिकृत काहीही सांगता येणार नाही असा निरोप रेल्वे विभागाकडून मिळत आहे. मुंबई, हैद्राबादहुन येणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आले आहेत.
माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांत अद्याप बचावकार्य सुरू
माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वकाव व मुंगशी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचावकार्याला वेग आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मोहिमेत काही नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरितांसाठी आर्मी व एनडीआरएफचे पथक सक्रीय आहे. सकाळी साडेनऊ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापुरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मीमार्फत फूड पॅकेट व पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. एनडीआरएफची अतिरिक्त टीम येथे कार्यरत असून बचाव मोहिमेत सातत्य ठेवले आहे. दारफळ येथे काल आठ नागरिकांचे एअरलिफ्टिंग झाले होते. उर्वरित 20 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळपासून पुन्हा ऑपरेशन सुरू झाले असून पाण्याची पातळी घटल्याने बोटीद्वारेही बचाव कार्य सुरू आहे.वकाव येथे 90 नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे दुसरे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, सांगोला तहसीलदार संतोष कणसे हे समन्वय साधत आहेत.