हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 05:18 PM2022-05-03T17:18:40+5:302022-05-03T17:19:01+5:30

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर : या आठवड्यात प्राथमिक अधिसूचना

Hattur-Tandulwadi Ankegaon Ring Road will pass through North Solapur taluka | हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार

हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार

googlenewsNext

सोलापूर : सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरची प्राथमिक अधिसूचना या आठवड्यात जाहीर होणार असून, त्यानंतर हरकतींसाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. सुरत-चेन्नई कॉरिडॉरच्या बजेटमध्ये हत्तूर ते तांदूळवाडी तसेच केगाव ते तांदूळवाडी या बाह्य वळणाचा अर्थात रिंगरुटचा समावेश करण्यात आला असून, रिंगरुटचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर रिंगरुटचा नेमका मार्ग सार्वजनिक होणार आहे. पुढील १५ ते २० दिवसात रिंगरुटचा डीपीआर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर ज्या शेती गटातून जाणार आहे, त्या गटांचे नंबर्स गॅझेट प्रसिद्ध झाले. यात काही गावांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे ज्या गावांची नावे नाहीत, ती वगळली आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला विचारले असता त्यांनी सांगितले, त्यांनी ज्या गावांचा डीपीआर पूर्ण झाला आहे त्यांचा गॅझेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. उर्वरित गावांचा डीपीआर लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा त्यांचा गॅझेटमध्ये समावेश करण्यात येईल.

सूरत-चेन्नई या नवा महामार्गाला जिल्ह्यात १५३ किलोमीटर अंतर लाभले आहे. बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. सुरत-चेन्नई महामार्गासाठी ७ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर झाली असून, त्यानंंतर जिल्हा प्रशासनाकडून शेती गटांची मोजणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू असून, भूमी राशी या पोर्टलवर बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावांचे गट नंबर भूमी राशी या पोर्टलवर अपलोड झाले आहेत. चार ते पाच दिवसात प्राथमिक अधिसूचना जाहीर होईल.

.................

दररोज १५ किलोमीटर रस्त्याच्या जमिनीची मोजणी होणार

मोजणीच्या कामात सुलभता व वेग येण्यासाठी रोव्हर मशीनद्वारे या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी होणार आहे. यासाठी पाच रोव्हर मशीन दाखल झाल्या आहेत. एक मशीन दररोज किमान तीन किलोमीटरची मोजणी करते. यामुळे दररोज १५ किलोमीटर रस्त्याच्या जमिनीची मोजणी होणार असून, अवघ्या १० दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Web Title: Hattur-Tandulwadi Ankegaon Ring Road will pass through North Solapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.