दुपारी कडक ऊन, तर रात्री थंडी; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले सोलापुरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 13:27 IST2022-01-23T13:27:50+5:302022-01-23T13:27:53+5:30
बदलते वातावरण : प्रत्येक घरातील किमान एक-दोघे तरी आजारी

दुपारी कडक ऊन, तर रात्री थंडी; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले सोलापुरात !
सोलापूर : शहर व जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी उन्हाची सवय होईपर्यंत रात्री थंडी पडत आहे. या लगेच बदलणाऱ्या वातावरणामुळे प्रत्येक घरातील किमान एक-दोघे तरी आजारी पडत आहेत.
शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्याचबरोबर कमाल-किमान तापमानातील घट, ढगाळ हवा अशा वातावरणामुळे शहरात घरोघरी सर्दी, ताप, खोकल्याच्या ‘व्हायरल फ्लू’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे सध्या क्लिनिकपासून ते शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी वाढत आहे.
---------
सिव्हिलची सर्दी-ताप-खोकला ओपीडी वाढली
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सर्दी-ताप-खोकला आजाराच्या ओपीडीत वाढ झाली आहे. नेहमी ४० ते ५० रुग्ण असताना सध्याच्या वातावरणात हा आकडा ७० च्या वर पोहोचला आहे. कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण फिवर ओपीडीमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. त्यांना कोरोनाचे निदान झाल्यास त्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत.
सध्याचे वातावरण हे दुपारी गरम आणि रात्री थंड असे आहे. या दोन्ही तापमानात शरीर अनुकूल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शरीराला योग्य समतोल साधता येत नाही. याचा परिणाम म्हणून सर्दी, खोकला, ताप, राहणारच, अस्थमा आदी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
- डॉ. विठ्ठल धडके, औषध वैद्यक शास्त्र तज्ज्ञ, शासकीय रुग्णालय
-------------
शक्यतो बाहेर पडणे टाळा
खूपच गरजेचे असल्यास बाहेर जावे. साध्या कारणासाठी बाहेर पडणे टाळावे. सकाळी व रात्री गरम कपडे घालावे. थंड पदार्थ टाळून गरम व ताजे अन्न सेवन करावे. डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितल्यास ती चाचणी करून त्यानुसार उपचार घ्यावा.
--------
तारीख कमाल तापमान किमान तापमान
- २१ जानेवारी ३४.० - १५.१
- २० जानेवारी ३३.४ - १३.२
- १९ जानेवारी ३२.४- १३.९
- १८ जानेवारी ३१.२- १५.६
- १७ जानेवारी ३१.० - १५.५