“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:43 AM2021-10-15T10:43:04+5:302021-10-15T10:43:51+5:30

गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

gulabrao patil says sharad pawar allowed unlicensed uddhav thackeray to drive volvo bus directly | “लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

Next

सांगोला:शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कौतुक करताना दुसरीकडे बोलण्याच्या नादात उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावरही शेरेबाजी केली. तर गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते, हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केले तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडल्याची टोलेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली. 

सगळेच चिंतेत असताना शरद पवारांनी आपले ब्रम्हास्त्र काढले

भाजपने निवडणुकीनंतर दगाबाजी केली. दोन महिने आघाडीच्या आमदारांची हॉटेल ते हॉटेल अशी फिरस्ती चालू होती. यातच पहाटेचा शपथविधी झाल्याने सगळेच चिंतेत असताना शरद पवार यांनी आपले ब्रम्हास्त्र काढले आणि  मेरे गाडीने बैठ जा म्हणत पुन्हा सगळे गोळा केले. अखेर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार बनल्याची आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली. आता ५० हजार सापडले की, आली ईडी असे झालेय. ईडी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एलसीबी पोलीस आहे, असा टोला लगावत शिवसेनेला जेलचे काय नावीन्य, शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल, आम्ही ईडीला घाबरत नाही. चंद्रकांत पाटील यांनी टीका करण्यापूर्वी कधी कापसाची बोन्डे, ऊस, कपाशी, केळी कधी पाहिली का आणि आज ते शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याची टीका करीत आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात. त्यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे ५६ आमदार हे आज भाजपसोबत असते. भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. या नगरसेवकांना भाजपने अपात्रतेची भीती दाखवली असावी, अशी शक्यता गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: gulabrao patil says sharad pawar allowed unlicensed uddhav thackeray to drive volvo bus directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app