शासनाचा आदेश; आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच धावणार एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:37 PM2021-04-23T18:37:23+5:302021-04-23T18:37:26+5:30

विभागाला दिवसाला ७० लाखांचा तोटा : आगारात फक्त दहा ते पंधरा चालक वाहक असणार

Government order; Now ST will run only for essential service personnel | शासनाचा आदेश; आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच धावणार एसटी

शासनाचा आदेश; आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच धावणार एसटी

Next

सोलापूर : राज्य शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर आणि जिल्ह्याबाहेर पडता येणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार गुरुवारी सायंकाळपासून सोलापूर विभागातील क्वचितच गाड्या या धावतील असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर विभागात एकूण नऊ आगार आहेत. या नऊ आगारातून दिवसाकाठी जवळपास साडेतीन हजार पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. त्यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. या सर्व आगारातून एसटी विभागाला दिवसाकाठी जवळपास सत्तर ते ऐंशी लाखाचे उत्पन्न मिळत होते. यातील सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर हे आगार उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मोठे मानले जाते. पण गेल्या काही दिवसापासून कोरोनामुळे अनेक प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. आता शासनाच्या नव्या आदेशानुसार गुरुवार सायंकाळपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.

सोलापूर आगारातून पुणे, हैदराबाद, नाशिक आदी मार्गांवर जादा वाहतूक करण्यात येत होती. यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडत होती. पण नव्या आदेशामुळे सर्व फेऱ्या जवळपास रद्द करण्यात येत आहे.

एसटी गाड्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आता एसटीने प्रवास करता येणार नाही. वैद्यकीय कारण असेल किंवा अत्यावश्यक कारण असेल अशा व्यक्तींना एसटी गाडीतून प्रवास करता येईल. पण यासाठीही एसटीला आसन शक्यतेच्या ५० टक्केच प्रवासी घेऊन प्रवास करण्यास परवानगी आहे. बहुतांश गाड्या बंद असल्यामुळे प्रत्येक आगारातून काहीच कर्मचाऱ्यांना सेवेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी आदेश काढण्यात येणार आहेत.

शासनाच्या आदेशानुसार गुरुवार सायंकाळपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी गाडीतून प्रवास करता येणार आहे. यामुळे सोलापूर विभागातील जवळपास ९९ टक्के या गाड्या थांबून राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्यापासून काहीच कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येईल.

-विलास राठोड, विभाग नियंत्रक

Web Title: Government order; Now ST will run only for essential service personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.