बस लागली अन खिडकीतून पिशवी टाकली, बार्शी स्थानकावर सहा हजारांची पर्स पळवली
By काशिनाथ वाघमारे | Updated: February 8, 2024 21:08 IST2024-02-08T21:08:20+5:302024-02-08T21:08:30+5:30
संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले.

बस लागली अन खिडकीतून पिशवी टाकली, बार्शी स्थानकावर सहा हजारांची पर्स पळवली
सोलापूर : स्थानकावर बस लागताच माहेरी निघालेल्या विवाहितेने बसायला जागा मिळवण्यासाठी खिडकीतून सीटवर पिशवी टाकली. पित्यासोबत आत चढून येईपर्यंत चोरट्यांनी पिशवीतील पर्स उघडून त्यातील सहा हजारांची रोकड पळवल्याची घटना बार्शी बस स्थानकावर घडली.
ही घटना गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. याबाबत पूजा अमोल पाटील (वय २६, रा. उंडेगाव, ता. बार्शी) या विवाहितेने बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, फिर्यादी पूजा या लातूरला माहेरी निघालेल्या होत्या. त्या पतीसोबत दुचाकीवर बसून बार्शी बस स्थानकावर आल्या. पुढे माहेरी नेण्यासाठी वडीलही स्थानकावर थांबले होते. इतक्यात तुळजापूर आगाराची बस आली आणि आत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. बसायला जागा मिळावी म्हणून पर्समध्ये पैसे असलेली पिशवी खिडकीतून सीटवर टाकली. बसमध्ये चढून सीटवर बसलेल्या विवाहितेने पिशवीतील पर्सची चेन उघडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी खाली उतरून शोध घेतला असता पैसे हाती लागले नाही. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.