Good News; सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल, मे च्या अवकाळीग्रस्तांना मिळेल दिवाळीपूर्वी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 16:07 IST2021-10-18T16:07:27+5:302021-10-18T16:07:32+5:30
नुकसानग्रस्त मदत दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

Good News; सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल, मे च्या अवकाळीग्रस्तांना मिळेल दिवाळीपूर्वी मदत
सोलापूर : चालू वर्षाच्या एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ५७ लाख १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त मदत दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अवकाळी पावसाने बागायती ४०.३० हेक्टरचे, तर २८६.९० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. ही मदत संबंधित तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ०.७० हेक्टर नुकसान झाले असून त्यांच्यासाठी १२ हजार ६०० रुपये, बार्शी तालुक्यात ५ हेक्टरचे नुकसान झाले असून ९१ हजार ९८०, दक्षिण सोलापूर तालुक्यात ८१.८० हेक्टरसाठी १३.८३ लाख, अक्कलकोट तालुक्यात ६.४० हेक्टरसाठी १ लाख १५ हजार, माढा तालुक्यात ४८.४५ हेक्टरचे नुकसान झाले असून ८ लाख ७२ हजार, करमाळा तालुक्यात १०.४० हेक्टरसाठी १ लाख ७५ हजार, पंढरपूर तालुक्यात १७१ हेक्टरसाठी ३० लाख १८ हजार, तर सांगोला तालुक्यात २.८० हेक्टरवरील नुकसानीसाठी ३९ हजार ६०० रुपये तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.