विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात विठुरायाच्या मंदिराला ३० किलो चांदीचा दरवाजा बसणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 00:30 IST2024-12-28T00:30:19+5:302024-12-28T00:30:33+5:30

दरवाजाला चांदी बसवण्याच्या कामामुळे सध्या येथून भाविकांना प्रवेश बंद असून, मुखदर्शनाची रांगदेखील रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे.

Good news for Vitthal devotees 30 kg silver door to be installed at pandharpur temple in the new year | विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात विठुरायाच्या मंदिराला ३० किलो चांदीचा दरवाजा बसणार 

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षात विठुरायाच्या मंदिराला ३० किलो चांदीचा दरवाजा बसणार 

Pandharpur Vitthal Mandir: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या विठ्ठलाला राज्यातील भाविक आपल्या परीने दान करीत असतात. याच प्रकारे नांदेड येथील एका भाविकाने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चांदीने मढविण्याचे कबूल केले आहे. यामुळे चांदीचा दरवाजा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व दरवाजे चांदीचे करण्याचा प्रयत्न असणार आहे. पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलभेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर प्रशासनाकडे देणगी स्वरूपातही रक्कम दिली जाते. अनेकदा दानपेटीला मौल्यवान वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्या वतीने या दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी ३० किलो चांदी लागणार असून, याची किंमत जवळपास ३० लाख रुपये आहे. 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून, या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ मंदिराचा दरवाजा चांदीचा करणार आहेत. दरवाजाला चांदी बसविण्याच्या कामामुळे सध्या येथून भाविकांना प्रवेश बंद असून, मुखदर्शनाची रांगदेखील रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल मंदिराच्या दरवाजासाठी चांदी देणाऱ्या भाविकाचे मी मंदिर समितीच्या वतीने आभार मानतो. मंदिराचे सर्व दरवाजे चांदीचे करण्याचा प्रयत्न असणार आहे. नव्या वर्षात मंदिराला चांदीचा दरवाजा असणार आहे. - हभप गहणीनाथ महाराज औसेकर

Web Title: Good news for Vitthal devotees 30 kg silver door to be installed at pandharpur temple in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.