शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग
By रवींद्र देशमुख | Updated: October 1, 2023 16:36 IST2023-10-01T16:36:41+5:302023-10-01T16:36:56+5:30
धरण ४० टक्क्यांच्या घरात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग
सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून गेल्या दोन दिवसापासून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवारी दुपारी दौंड मधून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे २५ हजाराचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची वाटचाल ४० टक्क्यांकडे सुरू झाली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के पार करणार आहे.
मागील तीन महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उजनी धरणात २० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा होता. चार दिवसांपूर्वी २४ टक्क्यांवर थांबलेल्या धरणात आता झपाट्याने पाणी पातळी वाढत आहे. मागील तीन-चार दिवसात जवळपास पंधरा टक्के पाणी धरणात वाढले आहे. शनिवारी रात्री दौंडमधून जवळपास २० हजाराचा विसर्ग सुरू होता.
त्यात रविवारी सकाळी वाढ होऊन २२ टक्क्यांचा विसर्ग सुरू होता. पुन्हा दुपारी बारा वाजल्यापासून २५ हजार ८०० क्युसेकचा विसर्ग सध्या दौंडमधून उजनी धरणात सुरू आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत उजनी धरण ४० टक्के पार करेल, अशी आशा आहे. गेल्या तीन महिन्यापासून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.