Good News; आता 1200 रुपयात होणार खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:49 IST2020-09-09T12:47:12+5:302020-09-09T12:49:51+5:30
चाचण्यांचे दर शासनाने ठरविले; मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची संख्या वाढली

Good News; आता 1200 रुपयात होणार खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी
सोलापूर : राज्यातील कोरोनाग्रस्तांना शासनाने दिलासा दिला असून, कोरोना चाचणीसाठी एनएबीएल आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर शासनाने ठरविल्याप्रमाणेच आकारावेत, असे परिपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी जारी केले आहे.
सामान्य जनतेला परवडणारे कोरोना चाचण्यांचे दर असावेत, अशी मागणी येत असल्याने राज्य शासनाने दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून त्यानुसार कोरोना चाचण्यांचे दर आकारले जाणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक संस्था, औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. परिवहन सेवाही सुरू झाली असून चाचण्यांसाठी रिएजंट्स, व्हीटीएम किट, पीपीई किट, एन-९५ मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन की जेम पोर्टलवर माफक दरात उपलब्ध झाले आहे. आयसीएमआरने उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची संख्याही वाढली आहे.
यामुळे कोरोना चाचण्यांचे सुधारित दर निश्चित करण्याचे शासनाने ठरविले आहे. कोणत्याही प्रयोगशाळेला सुधारित दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या सहीने जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आता चाचण्याला बाराशेपासून नवीन दराची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
असे आहेत सुधारित दर
संकलन केंद्रातून नमुने घेऊन तपासणी: १२०० रुपये (पूर्वीचा दर: १९००), दवाखाने, क्वारंटाईन सेंटरमध्ये नमुने घेणे: १६०० (२२००), रुग्णांच्या घरी जाऊन नमुने घेणे: २००० (२५००). यापेक्षा जादा दर आकारल्याचे निदर्शनाला आल्यास संबंधित प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.