भारताच्या गणितज्ज्ञांना जागतिक पुरस्कार
By Admin | Updated: August 14, 2014 00:14 IST2014-08-14T00:13:59+5:302014-08-14T00:14:44+5:30
इचलकरंजीच्या सुभाष खोत यांचा समावेश

भारताच्या गणितज्ज्ञांना जागतिक पुरस्कार
न्यूयॉर्क/इचलकरंजी : भारतीय वंशाच्या दोन शिक्षणतज्ज्ञांनी गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचे जागतिक पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये इचलकरंजीच्या सुभाष खोत यांचा समावेश आहे. यातील एकास गणिताचे नोबेल समजला जाणारा ‘फिल्डस् मेडल’ हा पुरस्कार मिळाला आहे. इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियनतर्फे (आयएमयू) हे पुरस्कार देण्यात येतात. सेऊल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणित परिषदेत मंजूल भार्गव यांनी फिल्डस् मेडल, तर सुभाष खोत यांनी रोल्फ नेवानलिन्ना पुरस्कार पटकावला. ‘युनिक गेम्स’ समस्येसंदर्भात आणि याची किचकटता समजून घेण्याचे प्रयत्न केल्याबद्दल खोत यांना नेवानलिन्ना पुरस्कार प्रदान करण्यात आला. खोत न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कौरेंट इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये विज्ञानाचे प्रोफेसर आहेत. त्यांनी प्रिंसटन येथून पीएच.डी. घेतली आहे. (वृत्तसंस्था)
पुरस्कार मिळविणारे सुभाष खोत इचलकरंजीतील
सुभाष खोत हे इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी गणित आॅलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत सलग दोन वेळेला रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर त्यांचे पवई-मुंबई येथील आयआयटीमध्ये पुढील शिक्षण पूर्ण झाले. चेन्नई येथून गणितात ते एम.एस्सी. झाले, तर अमेरिकेतील प्रिस्टल विद्यापीठामध्ये त्यांनी पीएच.डी. संपादन केली. सध्या न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये प्रा. खोत हे पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून सेवा बजावत आहेत. प्रा. खोत यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधनपर तीन बक्षिसे मिळाली आहेत. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘अॅलन टी वॉटरमन’ या पुरस्काराचा समावेश आहे. या पुरस्काराची रक्कम ते संशोधन आणि अन्य विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खर्च करणार आहेत. त्यांना सेऊल येथे मिळालेल्या या पुरस्कारावेळी त्यांच्या आई डॉ. जयश्री खोत, भाऊ डॉ. अमोल खोत हेही उपस्थित होते. प्रा. खोत यांना पुरस्कार मिळाल्याचे समजताच त्यांचे गुरू वामन गोगटे यांनी, सुभाष याने गणित क्षेत्रातील आपली गुणवत्ता जागतिक पातळीवर सिद्ध केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.