गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर पोलिसांची कारवाई
By दिपक दुपारगुडे | Updated: March 30, 2024 20:36 IST2024-03-30T20:35:46+5:302024-03-30T20:36:50+5:30
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते.

गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर पोलिसांची कारवाई
सोलापूर : पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे (वय २६, रा. पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एकजण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी ती माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना फोनद्वारे कळविली. त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलिस गेले. तेथे एक इसम संशयितरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले.
त्याचे नाव अभिजित भोरे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूचे खिशामध्ये एक लोखंडी गावठी बनावटीचा राउंड, एक १२ बोअर रायफलचा राउंड तसेच एक लोखंडी बनावटीचे वाघनख्या मिळून आल्या. त्यानंतर त्या गावठी कट्टा व राउंड जवळ बाळगण्याचा परवाना नसताना आढळला. गावठी कट्टा, लोखंडी राउंड, १२ बोअर राउंड, वाघनख्या पोलिसांनी जप्त केल्या.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहायक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, हवालदार शरद कदम, सूरज हेंबाडे, सिरमा गोडसे, बिपीनचंद्र ढेरे, नवनाथ माने, सचिन हेंबाडे, पोलिस कर्मचारी शहाजी मंडले, नीलेश कांबळे, समाधान माने, बजरंग बिचकुले, सायबर शाखेचे पोलिस अंमलदार योगेश नरळे यांनी केली आहे.