Ganpati Festival : मी निसर्गात! मुस्लिम बांधवांकडून पर्यावरणपूरक 'गणपती बाप्पा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 20:02 IST2018-09-13T20:02:09+5:302018-09-13T20:02:47+5:30
Ganpati Festival :वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल. झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा

Ganpati Festival : मी निसर्गात! मुस्लिम बांधवांकडून पर्यावरणपूरक 'गणपती बाप्पा'
सोलापूर - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, सोलापूर विशेष प्रशिक्षण केंद्र क्र.13 नई जिंदगी येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांमार्फत इको फ्रेंडली असा वृक्षरुपी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. श्रीगणेशाची नानाविध रूपे सर्वांनाच मोहीत करीत असतात. श्रीचे असेच एक मोहक आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रूप साकारण्यात आले आहे. मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी सर्गात आहे, असे सांगणारा हा पर्यावरणपूरक गणपती बाप्पा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल. झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश वस्तीपातळीवरील लोकांना बालकामगार विद्यार्थ्यांनी दिला आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात नई जिंदगी परिसरातील मुस्लिम समाजातील 9 ते 14 व 14 ते 18 वयोगटातील एकूण 45 बालकामगार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्वही पटवून दिले.
सामाजिक कार्यकर्ते वेदांत सुरवसे यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली व प्रसाद वाटण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वेदांत सुरवसे यांनी प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचे, कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कर्मचाऱ्यांचे खुप कौतुक केले. हा कार्यक्रम प्रकल्प संचालिका अपर्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामजिक कार्यकर्ता देवेंद्र पोतदार, शिक्षक वहिदा मुजावर, शितल कांबळे, सेविका उषा गायकवाड या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.