व्हाट्सअपवर २५ लाखाची लाॅटरी लागल्याचे सांगून २ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:29 IST2020-05-02T15:27:47+5:302020-05-02T15:29:55+5:30
रोपळे येथील प्रकार; पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल

व्हाट्सअपवर २५ लाखाची लाॅटरी लागल्याचे सांगून २ लाखाची फसवणूक
पंढरपूर: तुम्हाला कौन बनेगा करोडपती मध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा मेसेज व्हाट्सअप वर पाठवून दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रोपळे येथील संभाजी शिवाजी पवार यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी पवार यांना दि.१९ एप्रिल २०२० रोजी राणा प्रतापसिंग या व्यक्तीकडून व्हाट्सअप वर तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, त्यासाठी तुम्ही काही रक्कम आमच्या बॅक खात्यात जमा करावी लागेल असा मेसेज आला. त्यामध्ये काही व्हिडिओ देखील पाठवण्यात आले. पवार यांनी साकेत कुमार व इतरांच्या विविध खात्यांमध्ये टप्प्या टप्प्याने दोन लाख रुपयांची रक्कम जमा केल्यानंतर त्यांना आणखी रक्कम जमा करण्यास सांगण्यात येऊ लागले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये १ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.