सोलापूरजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चौघे जखमी
By Appasaheb.patil | Updated: June 23, 2023 16:14 IST2023-06-23T16:14:49+5:302023-06-23T16:14:56+5:30
सुप्रिया गणेश नरखेडकर (रा. अनगर, ता. मोहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

सोलापूरजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चौघे जखमी
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे गावाजवळ चार वाहनांचा शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुप्रिया गणेश नरखेडकर (रा. अनगर, ता. मोहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे. सोलापूरहून पुण्याकडे निघालेला हायवा टिपर भरधाव वेगात जात होता. यावेळी वेगात असलेल्या टिपरने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर कारला धडक देऊन कंटेनर ट्रकवर हायवा आदळला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे दाखल झाले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा आरोप करत आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर पुणे महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतुक काही काळ थांबली, त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा होत्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.