मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 15:01 IST2022-08-25T14:38:27+5:302022-08-25T15:01:55+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार यांचे निधन
मंगळवेढा : मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार ( वय ६८) यांचे गुरुवार दि २५ रोजी सकाळी सहा वाजता सोलापूर येथील तोष्णीवाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. त्यांना न्यूमोनिया झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या मकानदार यांनी अगदी अल्पकाळात मंगळवेढ्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सुरुवातीला ते शहा गटातून नगरसेवक झाले. १९९९ साली ते नगराध्यक्ष झाले. माजी नगराध्यक्ष रतनचंद शहा, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, आमदार समाधान आवताडे, धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळूनगे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
वीट उद्योजक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध होते. त्यांनी वीट व्यवसायातून मंगळवेढयाची दोन राज्यात ओळख निर्माण करून दिली होती. त्यांच्या कार्याचे सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुंडे यांनीही कौतुक केले होते. अल्पशिक्षित मकानदार यांनी मोठमोठ्या शिक्षण संस्थाना मदत केली.
त्यांचे परममित्र बंडोपत बुरजे यांचे गत महिन्यात निधन झाले होते. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असतानाही त्यांची घट्ट मैत्री होती. त्यांच्या निधनाचाही त्यांना धक्का सहन झाला नाही. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बाबूभाई मकानदार यांनी अनेक गोरगरीब, गरजूंना मदतीचा हात दिल्याने ते अजातशत्रू नेतृत्व म्हणून मंगळवेढा तालुक्यात परिचित होते. शिवजयंती, नवरात्र उत्सव, गैबीपीर उर्स, लतीफशाह उर्स मध्ये ते नेहमी अग्रभागी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.