सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

By विलास जळकोटकर | Published: April 3, 2024 06:34 PM2024-04-03T18:34:37+5:302024-04-03T18:35:16+5:30

अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले.

fire at a textile factory in Solapur was brought under control after seven hours | सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

सोलापूर: एकीकडे सूर्य आग ओकत असताना अक्कलकोट एमआयडीतील अन्नपूर्णा टेक्स्टाईल कारखान्याला बुधवारी सकाळी ८:१५ च्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले. तब्बल सात तासांनंतर ही आग आटोक्यात आणली गेली.

अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये ई८८/३ या जागेत प्रमोदकुमार गुलाबचंद दरगड (वय ५५) यांचा अन्नपूर्णा टेक्स्टाईल कारखाना आहे. येथे विविध प्रकारचे सुताचे टॉवेल तयार होतात. बुधवारी कारखान्याला सु्टी असल्यामुळे कारखाना बंद होता. सकाळी ८:१५ सुमारास बंद असलेल्या कारखान्यातून धूर येऊ लागल्याने मालकाला खबर देण्याबरोबरच ८:३० च्या सुमारास अग्निशामक दलाच्या कार्यालयाला कॉल करण्यात आला. ८:४५ च्या सुमारास एकापाठोपाठ भवानी पेठ, रविवार पेठ, सावरकर, होटगी रोडवरील अग्निशामक दलाच्या गाड्या मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांनी तातडीने घटनास्थळी पाठवल्या. सकाळी नऊ वाजल्यापासून आग आटोक्यात आणण्यासाठी सुरुवात झाली.
एकीकडे प्रचंड उष्मा आणि आगीचे लोळ यांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना शिकस्त करावी लागली. पाण्याचा प्रेशरने मारा करावा लागला. यासाठी खासगी पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नांनी अखेर दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
 
आगीच्या भक्ष्यस्थानी काय पडलं
या भीषण आगीमध्ये कारखान्यातील कच्चा व पक्का माल जळून खाक झाला. शिवाय पूर्ण पत्राशेड, इलेक्ट्रिक वायरिंग, डबलिंग मशिन, शिलाई मशिन पूर्णत: निकामी झाल्याचे सांगण्यात आले.
 
बुधवारच्या सुटीमुळे मनुष्यहानी वाचली
बुधवारच्या सुटीमुळे कारखाना बंद होता. कारखाना चालू असताना ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुटीमुळे मनुष्यहानी वाचल्याच्या भावना घटनास्थळी लोकांमधून व्यक्त झाल्या.

Web Title: fire at a textile factory in Solapur was brought under control after seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.