मेलामाईन पुरविणारा दलाल ललितभाईचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:36 PM2020-01-22T16:36:10+5:302020-01-22T16:40:11+5:30

पंढरपुरात भारतातील पहिला गुन्हा; इंदापुरातील दूध डेअरीच्या केमिस्टचा आढळला सहभाग

Finding a Melamine Broker Lalitbhai | मेलामाईन पुरविणारा दलाल ललितभाईचा शोध

मेलामाईन पुरविणारा दलाल ललितभाईचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपूर तालुक्यातील सुगाव येथील डेअरीतून भेसळयुक्त दूध पुरविले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाला मिळाली होती१० जानेवारी रोजी रात्री अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने डेअरीवर छापा मारला. दत्तात्रय महादेव जाधव या पशुवैद्यकाने ही डेअरी विनापरवाना थाटल्याचे आढळले

राजकुमार सारोळे 

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील दूध केंद्रांना रसायनयुक्तभेसळ दूध तयार करण्यासाठी मेलामाईनचा पुरवठा ललितभाई नावाच्या दलालाने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस या दलालाचा शोध घेत आहेत.

पंढरपूर तालुक्यातील सुगाव येथील डेअरीतून भेसळयुक्त दूध पुरविले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाला मिळाली होती. त्यानुसार १० जानेवारी रोजी रात्री अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने डेअरीवर छापा मारला. दत्तात्रय महादेव जाधव या पशुवैद्यकाने ही डेअरी विनापरवाना थाटल्याचे आढळले. त्याने नोकर गणेश गवळी याच्या मदतीने रसायनाचा वापर करून भेसळयुक्त दूध बनविल्याचे दिसून आले.

याप्रकरणी या दोघांविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम १८८, २७२, २७३, ३२८ व अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे भारतात प्रतिबंधीत असलेल्या मेलामाईन या पदार्थाचा दूध भेसळीत वापर केल्याचा देशातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी डॉ. जाधव याला अटक करण्यात आल्यावर पहिल्यांदा पाच व दुसºयांदा तीन दिवस पोलीस कोठडी तपासासाठी वाढवून मिळाली. आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 

पोलीस तपासादरम्यान डॉ. जाधव याने हे दूध इंदापूर तालुक्यातील दूध डेअरीला पुरविल्याचे सांगितले. या डेअरीतील केमिस्ट साळुंके याच्याशी हातमिळवणी करून तो हे दूध खपवत होता. डेअरी प्रशासनाला या दोघांच्या संगनमताची काहीच कल्पना नव्हती. डेअरी प्रशासनाने साळुंके याच्यावर कारवाई करण्यास परवानगी दिली असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त राऊत यांनी सांगितले. आता पोलीस तपासात आणखी काय काय निष्पन्न होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे. 

मेलामाईनचा दलाल झाला फरार
- अन्न व औषध प्रशासन छाप्यात मेलामाईनचा साठा पकडण्यात आल्याचे समजताच हे रसायन पुरविणारा दलाल ललितभाई हा पंढरपुरातून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा पोलीस तपास सपोनि पाटील तर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर हे करीत आहेत. केमिस्ट गोरख धांडे याच्यामार्फत ललितभाई नावाच्या दलालाने मेलामाईन खपविण्याचे जाळे पसरले होते, असे दिसून येत आहे. त्यामुळे ललितभाई हाती लागल्यावरच आता पुढील साखळी उघड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.

पॅराफिनचा दुसरा तपास सुरू
- अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात २९८ किलो पॅराफिनचा साठा सापडला आहे. पॅराफिन हे अखाद्य तेल आहे. दुधात स्निग्धता येण्यासाठी डॉ. जाधव याने याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. हेअर आॅईल, पेंटिंगमध्ये याचा वापर केला जातो. हे तेल आरोग्याला अपायकारक आहे. त्यामुळे याचा तपास औषध विभागाकडे देण्यात आला आहे. त्याने हे तेल कोठून आणले व हे अपायकारक आहे हे माहिती असूनही याचा वापर का केला, याचा तपास करण्यात येत आहे. 

स्निग्धता वाढीसाठी सर्वकाही
- गाई, म्हशी पाळण्यासाठी येणारा खर्च व जागेवर दुधाचा खरेदी दर परवडत नसल्याने शेतकरी व दुधाचा व्यापार करणारे गवळी दुधात पाणी घालत असल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच दुधाचा फॅट वाढविण्यासाठी प्रामुख्याने खाण्याचा सोडा, युरिया, मीठ, साखर याची दुधात भेसळ केली जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईत दिसून आले आहे. दुधाचा भाव फॅटवर ठरविला जातो. त्यासाठी हे सगळे भेसळीचे मार्ग शोधले गेले आहे. पण सुगाव भोसे येथील डॉ. जाधव याने चक्क रसायनाच्या मदतीने भेसळीचे बनविलेले दूध सर्वांना धक्का देणारे ठरले आहे. 

Web Title: Finding a Melamine Broker Lalitbhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.