दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी
By दिपक दुपारगुडे | Updated: November 11, 2023 18:52 IST2023-11-11T18:51:58+5:302023-11-11T18:52:29+5:30
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली.

दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी
सोलापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मराठा समाजाने कुणबी नोंदी असलेले पुरावे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात गेल्या पाच दिवसांपासून रेकॉर्ड विभागात जन्म-मृत्यू नोंदणी, क.ड.ई पत्रक, लोकसंख्या रजिस्टर, सर्वे नंबर उतारे असे १८०१ पासूनचे कुणबी नोंद असलेले पुरावे शोधकाम पाच दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान चार गावांत १५ कुणबी नोंदी आढळून आल्या.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली.
त्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात आवश्यक जुने दस्तावेज उपलब्ध करण्याच्या दृष्टीने दक्षिण तहसील कार्यालयात तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला. या ठिकाणी तहसीलमध्ये नक्कल विभागात उपलब्ध असलेल्या सर्व गावांच्या दप्तराची तपासणी सुरू केली. यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांची नियुक्ती केली. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (उत्पादन शुल्क), उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपनिबंधक सहकारी संस्था, मुख्याधिकारी यांचा यामध्ये समावेश केला.
चार गावांत आढळल्या नोंदी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी-२, मुळे- १, चिंचपूर-८, वडजी-४ अशा एकूण -१५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी, कुणबी- मराठा किंवा मराठा- कुणबी या संदर्भांतील कागदपत्रे उपलब्ध असतील तर त्याची वैधता तपासणीसाठी घेऊन तहसील कार्यालयात यावे. कागदपत्रे मोडी लिपितील असतील तरी तपासून घेण्यात येतील, असे अवाहन तहसीलदार अमोल जमदाडे यांनी केले आहे.