युरोपच्या अभ्यास दौऱ्यात असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पॅरिसमध्ये केला छत्रपतींचा जयजयकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:10 IST2026-02-19T20:09:38+5:302026-02-19T20:10:27+5:30
शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिस मधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डी चे भूमिपुत्र काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

युरोपच्या अभ्यास दौऱ्यात असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पॅरिसमध्ये केला छत्रपतींचा जयजयकार
सोलापूर : राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप देशांचा अभ्यास दौऱ्यास १५ रोजी प्रारंभ झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५२ प्रगतिशील शेतकरी व दोन कृषी अधिकारी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिस मधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डी चे भूमिपुत्र काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युरोप अभ्यास दौऱ्यात असलेल्या बावन्न शेतकऱ्यांच्या व दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे अन् शिवरायांची प्रतिमेने पॅरिस शहरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमेचे तसेच तिरंगा व भगव्या ध्वजाचे पूजन मान्यवर अधिकारी व शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत झाले. या अभ्यास दौऱ्यास प्रस्थान होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या गटाशी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. हा अभ्यास दौरा फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या प्रगत कृषी देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्या दरम्यान शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय, सहकारी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान, जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.