सोलापूर : जाधववाडी (मोडनिंब, ता. माढा) येथे शोभेची दारु बनवणाऱ्या कारखान्यात शनिवारी दुपारी स्फोट झाला. या दुर्घटनेत शोभेची दारु बनवणारा जखमी झाला असून त्याला सोलापूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची चौकशी सुरू झाली असून याप्रकरणी जखमी दत्तात्रय विष्णू बिनगे याच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या ठिकाणापासून काही अंतरावर थांबल्याने चार कामगार बचावले आहेत.शनिवार, २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान हा स्फोट झाला असून याप्रकरणी गणेश जगताप या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजळव जाधववाडी येथे मधूकर रामचंद्र बिनगे यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या १० बाय १२ फूट आकाराच्या शेडमध्ये फटाका कारखाना सुरू होता. या कारखान्याभोवती ऊस आणि द्राक्ष बाग आहे. या कारखान्यात शनिवारी दुपारी शोभेची दारु बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी स्फोट झाला आणि शेडवरील पत्रे उडाले. तसेच धूर आणि जाळ दिसून आला.
घटनास्थळी पोलिसांची धाव ..स्फोटाचा आवाज येताच जवळचे शेतकरी धाऊन आले. या घटनेदरम्यान शंभर फुटावर चौघेजण थांबलेले होते. मात्र अंतर असल्याने ते बचावले. दरम्यान याची माहिती मिळताच टेंभुर्णीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दत्तात्रय बिणगे यास उपचारासाठी सोलापूरला हवण्यात आले.