कुंपणानच शेत खाल्लं; एक्साईजचा जवान अँटी करप्शनच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2023 13:33 IST2023-01-03T13:32:02+5:302023-01-03T13:33:42+5:30
तडजोडीत २० हजार ठरले: जामिनासाठी तीस हजाराच्या लाचेची मागणी

कुंपणानच शेत खाल्लं; एक्साईजचा जवान अँटी करप्शनच्या जाळ्यात
विलास जळकोटकर, सोलापूर
सोलापूर : दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदाराला जामिनासाठी सहकार्य म्हणून तीस हजाराची लाच मागितली. तडजोडीने वीस हजार रुपये घेण्यावर ठरले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाला अटक करण्यात आली.
मलंग गुलाब तांबोळी (वय ३३ वर्षे, सध्या रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर) असे या जवानाचे नाव आहे.
यातील तक्रादाराच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करुन दारुबंदी कायद्यान्वये तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला होता. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी तक्रारदाराने प्रयत्न सुरु केले होते. राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या मलंग गुलाब तांबोळी यांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली.
यावर दोघांमध्ये तडजोड झाली आणि २० हजाराच्या रक्कमेवर तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने लाच लुचपत पथकाच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. पथकाकडून १४ ऑक्टोबर रोजी तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यात तथ्य असल्याचे आढळून आले. सोमवारी रात्री उशिरा सापळा लावून संबंधीत जवानाला अटक करण्यात आली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक प्रमोद पकाले, अतुल घाडगे, उमेश पवार, स्वप्नील सन्नके, चालक उडाणशिव यांच्यासह ॲन्टीकरप्शनच्या पथकांनी केली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम ७ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"