विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
By दिपक दुपारगुडे | Updated: October 25, 2023 18:16 IST2023-10-25T18:15:04+5:302023-10-25T18:16:39+5:30
अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. तर काही गावे याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर धरलेला आहे. मागील चार दिवसांत तालुक्यातील २५ गावांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी जाहीर केलेली आहे तर वाखरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. तर काही गावे याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांची पंढरपूर येथे सभा झाली होती. त्यानंतर अंतरवाली सराटी येथील सभेला तालुक्यातून दहा हजारांहून अधिक समाजबांधव गेले होते. यानंतर तालुक्यात आंदोलनाची धग कायम होती. २४ ऑक्टोबरची शासनाला दिलेली ४० दिवसांची मुदत संपताच मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पंढरपूर तालुक्यात गावोगावी आरक्षण आंदोलन जोर धरू लागले आहे, असे दिसते.
तालुक्यातील वाखरी, गादेगाव, चळे, खेड भोसे, करकंब, पट कुरोली, भंडीशेगाव, सुस्ते, तारापूर, खरसोळी, अजन्सोंड, तुंगत अशा गावांमध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी जाहीर केलेली आहे.