शिक्षकांना 'बीएलओ' चे काम देताना जबरदस्ती करू नका; आ. कपिल पाटलांचा इशारा
By Appasaheb.patil | Updated: August 20, 2023 13:17 IST2023-08-20T13:16:56+5:302023-08-20T13:17:14+5:30
निवडणुकीचे काम न करणाऱ्या सोलापूर शहरातील १८ शिक्षक व मनपा कर्मचाऱ्यांवर बीएलओ ड्युटी संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

शिक्षकांना 'बीएलओ' चे काम देताना जबरदस्ती करू नका; आ. कपिल पाटलांचा इशारा
सोलापूर : कोणत्याही शिक्षकाला जबरदस्तीने 'बीएलओ' ड्युटी देता येत नाही, ही ड्युटी ऐच्छिक आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून लवकरच याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील यांनी दिल्याचे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमाेरे यांनी दिली.
निवडणुकीचे काम न करणाऱ्या सोलापूर शहरातील १८ शिक्षक व मनपा कर्मचाऱ्यांवर बीएलओ ड्युटी संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबत सदर बझार पोलीस स्टेशनला नायब तहसिलदारांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर शिक्षक भारती संघटनेचे गुन्हे दाखल करणे ही बाब चुकीचे असल्याचे सांगितले.
एकाच शाळेतील अनेक शिक्षकांना ड्युटी देणे, ठराविक शाळेतील शिक्षकांना ड्युटी देणे, महिला शिक्षकांना ड्युटी देणे, सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांनाही ड्युटी देणे, वर्षानुवर्ष एकाच व्यक्तीला ड्युटी देणे अशा प्रकारच्या बाबींवर नुकतीच शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याशी चर्चा केल्याचेही काटमोरे यांनी सांगितले. बीएलओ संदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास संघटनेकडे संपर्क साधावा असेही आवाहन शिक्षक भारतीच्यावतीने करण्यात आले आहे.