हजारो मुलांचे जीवन केले प्रकाशमय करणारा दिव्यांग अविनाश बनला बुद्धिबळाच्या पटावरचा राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:53 IST2020-12-03T16:43:51+5:302020-12-03T16:53:54+5:30
अविनाश लोंढे बनले अधिकारी : बुद्धिबळाच्या पटावरचा राजा

हजारो मुलांचे जीवन केले प्रकाशमय करणारा दिव्यांग अविनाश बनला बुद्धिबळाच्या पटावरचा राजा
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : दिव्यांगावर मात करीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्वत: अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. त्यानंतर तब्बल अडीच हजार गोरगरीब मुलांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी सहकार्य करून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. इतकेच नाही तर बुद्धिबळाच्या पटावर राज्यस्तरीय गुणांकन मिळवत राजा बनला. अशा अवलियाचे नाव आहे उपकोषागार अधिकारी अविनाश लोंढे.
जन्मगाव चिंचोली, ता. माढा. घरची परिस्थिती बेताचीच. पण कधीही त्याचा गवगवा केला नाही. शिक्षणाच्या सर्वच टप्प्यात यश मिळविले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. बघता बघता ते विद्यापीठात बुद्धिबळचे आयकॉन बनले. पदवीनंतर पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली अन् २००६ साली या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कोषागार विभागात अधिकारी झाले.
याही क्षेत्रात उमटवला ठसा
२०१५ साली त्यांची माढ्यात बदली झाली. त्यानंतर आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी काहीतरी करावे म्हणून रोजचे शासकीय काम उरकून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरिरीने भाग घेऊ लागले. पाणी फाउंडेशनच्या कामातून आठ बंधारे दुरुस्ती केले. चार किलोमीटर खोदकाम लोकसहभागातून करून घेतले. पंचवीस एकरात सीसीटी बनविल्या आहेत. चिंचोली गावात स्वतः परिश्रम करीत पाच हजार झाडे लावली. त्याचा सध्या गावाला खूप फायदा होत आहे. या कामांमुळे गावचा कायापालट होऊन करोडो लिटर पाणी साचून गावचा टँकर कायमस्वरुपी बंद झाला. सर्वच विहिरी, बोअरची पाणी पातळी वाढली.