देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश
By Appasaheb.patil | Updated: May 25, 2023 13:32 IST2023-05-25T13:31:33+5:302023-05-25T13:32:11+5:30
सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश
सोलपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन झाले. सोलापूर विमानतळावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास विमानतळावर दाखल झालेल्या फडणवीसांच्या हस्ते एक वाजता सात रस्ता येथील नियोजन भवनच्या शेजारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. सध्या ते नियोजन भवनात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेत आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजता हेरिटेज लॉन्स येथे आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक लोकप्रतिनिधी भाजपात प्रवेश करणार आहेत. सायंकाळी ५:४५ वाजता सोलापूर विमानतळावरून विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.