पैसे देऊनही प्लॉट नावावर न करता वृद्धाची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 21:05 IST2024-05-10T21:05:13+5:302024-05-10T21:05:29+5:30
डेव्हलपरविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे देऊनही प्लॉट नावावर न करता वृद्धाची केली फसवणूक
सोलापूर : विजापूर रोडवरील आनंदवन सुंदर प्लॉट अभिनव योजनेमध्ये प्लॉट नावावर न करता, पैसे घेऊन वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी डेव्हलपरविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१४ मध्ये एका दैनिकात विजापूर रोडवरील सोरेगाव येथे आनंदवन सुंदर प्लॉटची अभिनव योजना या मथळ्याखाली ओपन प्लॉटस व रो हौसिंग योजनेची जाहीरात आली होती. जाहीरातीमध्ये आनंदवन वसाहतीचे डुप्लीकेट मुख्य गेट, अंतर्गत डांबरी रस्ते, पाण्याची व्यवस्था, सुसज्य गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया, स्वतंत्र ७/१२ उतारा, महापालिकेच्या नगर रचना विभागाची मान्यता व बिगरशेती केल्याची खात्री दिली होती.
जाहीरात पाहून माया मनोहर औरंगाबादकर (वय ७० रा. मेडिकल हौसिंग सोसायटी) व मनोहर औरंगाबादकर यांनी संपर्क साधला. दीशा रॉयल्टी मल्टिकन्स्ट्रक्शनमध्ये दोन प्लॉट घेतले. प्लॉटची रक्कम १४ लख ४० हजार ३०६ रूपयाचा व्यवहार ठरला होता. प्लॉटची नोटरी करते वेळी ५० हजार रूपये रोख व दोन लाख रूपयाचा धनादेश दिला होता. मात्र डेव्हलपरने धनादेश न घेता सर्व रक्कम रोख स्वरूपात स्विकारली. त्यानंतर व्यवहाराच्या ठरलेल्या रक्कमेप्रमाणे संपूर्ण रक्कम औरंगाबादकर यांनी दिली.
बऱ्याच दिवसानंतर मनोहर औरंगाबादकर हे प्लॉटच्या ठिकाणी सुधारणा झाली का नाही हे पाहण्यासाठी गेले. मात्र एकही सुधारणा दिसून आली नाही. तेव्हां त्यांनी सुधारणा नसेल तर संपूर्ण रक्कम परत करा अशी मागणी केली. डेव्हलपरने रक्कम नंतर देतो असे सांगून दिली नाही. शिवाय प्लॉटही नावावर केला नाही. औरंगाबादकर यांची व अन्य लोकांची फसवणूक केली म्हणून फिर्याद दिली. या प्रकरणी राहूल एकनाथ बासुतकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास अजय पोपळभट करीत आहेत.