पंढरपुरातील कार्तिक यात्रेतील शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार
By Appasaheb.patil | Published: October 18, 2022 04:01 PM2022-10-18T16:01:46+5:302022-10-18T16:02:07+5:30
ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती देणार लवकरच देणार निमंत्रण
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा भाविकांच्या दर्शनरांगेसाठी असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप पाडण्याबाबतचा प्रस्ताव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आहे. याबाबत मंदिर समितीला विश्वासात घेतले नसून मंदिरासंदर्भात विकासकामे करताना समितीला विश्वासात घ्यावे, असे मत समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुढील महिन्यात होत असलेल्या कार्तिक वारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लवकरच फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीनंतर औसेकर महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
ह. भ. प. औसेकर महाराज यांनी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पाठवणे, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जादा कामाचा भत्ता, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान, बक्षीस, दिवाळी अग्रीम देणे, भक्तनिवास येथे निवासासाठी आलेल्या यात्रेकरूंसाठी ई-बस सुविधा उपलब्ध करुन देणे, विविध सण, यात्रा, उत्सवातील विठ्ठलाच्या मिरवणुकीसाठी तसेच पालखी सोहळ्यासाठी दानशूर भाविकांमार्फत रथ उपलब्ध करून घेणे, गोळेशाळेत विविध विकासात्मक कामे करणे, भाविकांना चप्पल स्टँड व दर्शन रांगेत प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उपलब्ध करून देण्याचे ठरल्याचे सांगितले.