सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 03:52 PM2021-10-03T15:52:27+5:302021-10-03T15:52:33+5:30

ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण : काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Dengue also affects children up to ten years of age in Solapur; Parents, pay attention to the symptoms! | सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष !

सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष !

Next

सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना डेंग्यू डोके वर काढत आहे. शहरात जुलै महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या १८५ होती, तर ऑगस्ट महिन्यात यात वाढ होऊन ३२३ इतकी डेंग्यू रुग्णांची संख्या झाली. यात सुमारे ४० टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील आहेत,  तर ३१ टक्के  डेंग्यूचे रुग्ण हे १० ते २० वर्ष वयोगटातील आहेत. या संख्येचा विचार करता लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होते. तेंव्हापासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. पावसाचे पाणी साचल्यास त्यात अळ्या निर्माण होऊन डेंग्यू, हिवताप सारखे आजार होतात. यामुळे पावसाळ्यात अशा आजारापासून सुरक्षित राहणे गरजेचे असते. डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करण्यासाठी आरोग्य विभाग व महापालिकेचा कीटकनाशक विभाग स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेच्या दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी डेंग्यू, मलेरिया होऊ नये याची काळजी घ्यावी. फ्रीज, कुलर, रिकामे टायर, भांडी यात पाणी साचले असल्यास ते स्वच्छ करावे. पाऊस पडल्यानंतर अशा वस्तूंकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

दाट वस्तीत अधिक डेंग्यूचे रुग्ण
शहरातील दाट वस्तीत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळत आहेत. न्यू पाच्छा पेठ, जोडभावी पेठ, शेळगी, भवानी पेठ, बेगम पेठ या भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, महापालिकेतील जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शहरात कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे.


ही लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा

  • अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही मुख्य लक्षणे
  • रक्तस्रावित डेंग्यू तापाचे निदान हे हात-पाय, चेहरा व मान यावर आलेल्या पुरळांवरून केले जाते.
  • डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी 
  • नाकातून, हिरडयातून व गुदद्वारातून रक्तस्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

सिव्हिलमधील लहान मुलांचा वॉर्ड फुल्ल

  •  सिव्हिल हॉस्पिटलमधील लहान मुलांचा वॉर्ड हा फुल्ल झाला आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण हे सर्वाधिक आहेत. अनेक मुलांमध्ये डेंग्यूचे लक्षणे दिसत असताना त्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह येत नाही. या प्रकारच्या रुग्णांची सोनोग्राफी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 
  •  सिव्हिलच्या जनरल वॉर्डाची क्षमता ९० असताना १०५ बालरुग्ण उपचार घेत आहेत, तर आयसीयुची क्षमता १५ असताना २६ बालरुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे बालविकार तज्ज्ञ डॉ. शाकीरा सावस्कर यांनी सांगितले.

 

Web Title: Dengue also affects children up to ten years of age in Solapur; Parents, pay attention to the symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.