काम करताना शॉक लागल्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 18:04 IST2022-05-11T18:03:54+5:302022-05-11T18:04:36+5:30
सोलापूर शहरातील अपघात ; एक जखमी

काम करताना शॉक लागल्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; सोलापुरातील घटना
सोलापूर : शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज (दि. ११ मे) मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. तर कंत्राटी कर्मचारी जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखे अंतर्गत बुधवारी (दि.११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी श्री. अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे २२ वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले होते.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले महावितरणचे कर्मचारी शेख रब्बानी अहमद यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर कंत्राटी कर्मचारी श्री. तांबोळी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षक यांच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.