तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:01 IST2025-11-02T12:00:32+5:302025-11-02T12:01:28+5:30
कार्तिकी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने १३० कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कार्तिकी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.