सिग्नलची वायर कट करून रेल्वेत घुसले; महिलांना मारहाण करून सोने लुटले

By appasaheb.patil | Published: March 2, 2021 05:30 PM2021-03-02T17:30:23+5:302021-03-02T17:36:10+5:30

यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेसवर दरोडा : जखमी प्रवाशांवर सोलापुरात उपचार; तब्बल चार तास गाडी सोलापूर विभागात थांबली

Cut the signal wire and entered the train; Gold was looted by beating women | सिग्नलची वायर कट करून रेल्वेत घुसले; महिलांना मारहाण करून सोने लुटले

सिग्नलची वायर कट करून रेल्वेत घुसले; महिलांना मारहाण करून सोने लुटले

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : यशवंतपूरहून (बंगळुरू) अहमदाबादकडे जाणाऱ्या फेस्टिव्हल एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी बोगीत बसलेल्या महिला प्रवाशांना मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तब्बल चार तास यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस सोलापूर विभागातच थांबविण्यात आली होती.

सोनाली प्रफुल्ल सुरपुरिया (वय २५, रा. गुणेनी, महालक्ष्मी कॉलनी, मातोश्री गार्डनसमोर, विनायकनगर, अहमदनगर) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेत कबिता बसनेट (वय ४५), खेमा राम (वय ६५) व गजेंद्र सोनार (वय ५२, सर्व अहमदनगर) हे तीन प्रवासी जखमी झाले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंतपूर-अहमदाबाद फेस्टिव्हल एक्स्प्रेस सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर-बोराेटी रेल्वेस्थानक परिसरात आली असता चोरट्यांनी सिग्नल बंद करून रेल्वे थांबविली. त्यानंतर त्यांनी बोगीत घुसून महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलांनी नकार देत चोरट्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. याचवेळी चिडलेल्या चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण करून घड्याळ, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा एकूण तीन लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

एकीकडे बॅण्ड, बॅंजोचा आवाज, तर दुसरीकडे जखमींवर उपचार

सोमवारपासून सोलापूरकरांच्या हक्काची हुतात्मा एक्सप्रेस सुरू होणार होती. त्यामुळे सोलापुरातील रेल्वे प्रवासी संघटनांनी त्यांचे जोरदार स्वागत करण्यासाठी बॅण्ड, बॅंजाे आणला होता, एकीकडे आनंदात असलेले रेल्वे प्रवाशांचा बॅण्ड, बँजोचा आवाज तर दुसरीकडे दरोड्यात जखमी झालेल्या प्रवाशांवर सोलापूर रेल्वेस्थानकावरच उपचार सुरू होते.

चोरट्यांचा पूर्वनियोजित दरोडा...

रेल्वे कशी थांबवायची.. कोणत्या बोगीत चढायचे.. कसा दरोडा टाकायचा...पोलीस आल्यास काय करायचे याबाबतचे सूक्ष्म नियोजन दरोडेखोरांनी केल्याचे सांगण्यात आले. अंदाजे दहा ते बारा दरोडेखोर या घटनेत सहभागी असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत रेल्वे पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

प्रवाशांची आरडाओरड अन् अंधारात गोंधळ...

बोरोटी येथे रेल्वेत दरोडा पडल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर मदतीसाठी रात्रीच्या अंधारातच प्रवाशांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान दाखल झाले. रेल्वे पोलिसांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे पहाटे अडीच वाजता बोरोटी स्थानक परिसरात थांबविलेली गाडी पहाटे ५.१५ वाजता सोलापूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली. सोलापुरात जखमी रेल्वे प्रवाशांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजता ही गाडी अहमदाबादकडे रवाना झाली.

वेळेत उपचारासाठी स्टेशन मास्तरांची धावाधाव

सोमवारी पहाटे ५.१५ वाजता एक्सप्रेस सोलापूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली. अगोदरच घटनेची माहिती मिळाल्याने रेल्वे प्रशासन सज्ज झाले होते, आरपीएफ जवानांसह लोहमार्गचे पोलीस उपस्थित होते. तात्काळ जखमींवर उपचार करण्यासाठी रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. इंगळेश्वर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले. पहाटेच्या सुमारास जखमींना वेळेत उपचार मिळावा यासाठी स्टेशन मास्तर संजीव अर्धापुरे यांनी धावाधाव करीत मोठी मदत केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू...

घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली. दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचेही काम सुरू असल्याचे अमाेल गवळी यांनी सांगितले.

दोन वर्षानंतर पडला दरोडा...

रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी मागील काही वर्षापासून रेल्वेत पडणारे दरोडे रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या होत्या. शिवाय विविध स्टेशन व सातत्याने दरोडा पडणाऱ्या ठिकाणांवर बंदुकधारी जवान तैनात केले होते, त्यामुळे मागील दोन वर्षात सोलापूर विभागात एकही दरोडा पडला नव्हता, मात्र सोमवारी पडलेला हा दरोडा दोन वर्षानंतर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेवर एक नजर

  • -मध्यरात्री २.१५ सिग्नल कट करून जंक्शन वायर तोडली
  • -मध्यरात्री २.२५च्या सुमारास कॉलिंग वायर तोडली
  • - अंदाजे पावणेतीनच्या सुमारास रेल्वे चालकास सिग्नल रेड दिसले
  • - पहाटे तीनच्या सुमारास दरोडा पडला
  • - तब्बल पंधरा ते वीस मिनिटांच्या थरारानंतर चोरटे पळून गेले
  • - साडेतीनच्या सुमारास जागी झालेल्या प्रवाशांनी मदतीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
  • - सुमारे एक तास भयभीत झालेल्या प्रवाशांची समजूत काढण्यात गेला.
  • - ५.३० मिनिटांनी एक्सप्रेस बोरोटी स्थानकावरून सोलापूरकडे मार्गस्थ झाली
  • - ५.५३ वाजता एक्सप्रेस सोलापूर स्थानकात पोहोचली
  • - सकाळी ७ वाजता एक्सप्रेस सोलापूरहून अहमदाबादकडे मार्गस्थ झाली...

Web Title: Cut the signal wire and entered the train; Gold was looted by beating women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.