सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाड दोन वर्षासाठी तडीपार
By रूपेश हेळवे | Updated: March 8, 2023 19:50 IST2023-03-08T19:49:54+5:302023-03-08T19:50:11+5:30
सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाडला दोन वर्षासाठी तडीपारीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाड दोन वर्षासाठी तडीपार
सोलापूर : लोकांना धमकावून शस्त्राचा धाक दाखणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, जनतेच्या संपत्तीचे मोडतोड करून नुकसान करणे तसेच मारहाण करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड (वय २६, रा. जुना विजापूर नाका, २ नंबर झोपडपट्टी) याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याला सोलापूर शहर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधून तडीपार करण्यात आले आहे.
आगामी काळात विविध जातीधर्माचे सण उत्सव मिरवणुका निघणार आहे. शिवाय महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर विजापूर नाका, सदर बझार, एमआयडीसी, सलगर वस्ती या पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिले. त्यास मंगळवार ७ मार्च २०२३ पासून तडीपार करण्यात आले आहे.