आता कोरोनाग्रस्त रूग्णांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 14:19 IST2020-11-30T14:15:28+5:302020-11-30T14:19:05+5:30
आधाराची गरज : ‘सिव्हिल’मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

आता कोरोनाग्रस्त रूग्णांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार
सोलापूर : प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात नसतानाही उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताची तपासणी करून मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजात राहण्याची सवय असते. समाजापासून दूर गेल्यास त्याला एकटे वाटायला लागते. कोरोना आजाराच्या रुग्णाला एकटे रहावे लागत असल्यामुळे अशा रुग्णात मानसिक समस्या असण्याची जास्त शक्यता असते. या समस्या दूर करण्यासाठी मनोरुग्णांवर स्वतंत्र उपचार पद्धतीचे नियोजन करावे. प्रत्येक रुग्णाच्या सर्व माहितीची मानसोपचारतज्ज्ञांनी नोंद ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी फक्त समस्या असणाऱ्या रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात येत होती. या आदेशामुळे सर्वच कोरोना रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात येणार आहे.
अशी होणार तपासणी..
- - मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णाचे आठवड्यातून एकदा समुपदेशन करावे.
- - रुग्णातील मनोविकारांचे निदान करण्यासाठी डॉक्टरसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- - औषधे रुग्णाजवळ न ठेवता देखरेखीखाली दिली जावीत.
- - रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ नसल्यास खासगी तज्ज्ञांची नेमणूक करावी
- - डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांच्यातील तणाव दूर करावा
कोरोना आजारात लोकांपासून दूर रहावे लागत असल्यामुळे त्याला निराशा, एकटेपणा, भीती वाटणे, न्यूनगंड अशा समस्या येतात. औषध व समुपदेशनाने या ससम्या दूर होतात. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिव्हिलमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. त्यांना मानसिक आजारासंबंधी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
- डॉ. कुंदन कांबळे, विभाग प्रमुख, मानसोपचार विभाग, शासकीय रुग्णालय