कोरोनामुळे डोळे उघडले अन् सोलापुरातील आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 PM2021-07-01T16:13:15+5:302021-07-01T16:13:21+5:30

मनपाचे कोविड हॉस्पिटल : शासकीय रुग्णालयाची क्षमता वाढविली

Corona opens eyes, increases ICU, oxygen, ventilator beds in Ansolapur | कोरोनामुळे डोळे उघडले अन् सोलापुरातील आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड वाढले

कोरोनामुळे डोळे उघडले अन् सोलापुरातील आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड वाढले

Next

सोलापूर : कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडल्याचे दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले. काेरोनाच्या पहिल्या लाटेत आलेल्या अनुभवावर दुसऱ्या लाटेत रुग्णसेवेसाठी मनपाचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल, तर शासकीय रुग्णालयाच्या बेड क्षमतेत वाढ करण्यात आली. इतर रुग्णालयांमध्ये आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या बेडमध्ये दुपटीने वाढ केल्याचे दिसून येत आहे.

महामारीमुळे आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केल्यामुळे बऱ्याच काळानंतर आरोग्य सेवा सक्षम झाल्याचे दिसत आहे. मार्च २०२०मध्ये कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाला. महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली. महापालिका, जिल्हा आरोग्य, ग्रामीण आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या शासकीय रुग्णालयाची यंत्रणा वापरण्यात आली. पण संसर्ग वाढल्यावर ही यंत्रणा कमी पडू लागल्यावर खासगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलची मान्यता देऊन बाधितांवर उपचार करण्यात आले.

पहिल्या लाटेत महापालिका क्षेत्रात ३ कोविड केअर सेंटरमध्ये ८५२ बेड, ५ क्वारंटाईन केंद्रात १ हजार ३८३ व १४ हॉस्पिटलमध्ये १ हजार १५५ बेड उपलब्ध करण्यात आले. ग्रामीणमध्ये ३३५ कोविड केअर व उपचार केंद्रात ६ हजार ४४ बेड, आयसीयू : ४८८ व व्हेंटिलेटरचे १९१ बेड होते. पण सप्टेंबर २०२० मध्ये संसर्ग वाढल्यावर ही यंत्रणा कमी पडली. याचा अभ्यास करून दुसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. यावेळी मात्र महापालिकेने २० बेडचे स्वत:चे कोविड हॉस्पिटल सुरू केले. त्याचबरोबर इतर दोन ठिकाणी २०० बेडची उपलब्धता केली. खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या वाढविली. जिल्हा आरोग्य विभागाने ३० क्वारंटाईन, १४ कोविड केअर व ५२ हॉस्पिटलमध्ये वाढ केली. यात ३ हजार ८९६ साधे बेड, १ हजार ११ ऑक्सिजन बेड, ३५६ आयसीयू आणि १६२ व्हेंटिलेटरमध्ये वाढ केली. तरीही संसर्ग वाढल्याने एप्रिलमध्ये ऑक्सिजन व बेडची कमतरता जाणवली.

ग्रामीण भागातही वाढ

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. बार्शी, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात संसर्ग दिसून आला. अकलूज, पंढरपूर, बार्शी, सांगोला, माढा या ठिकाणी कोविड हॉस्पिटलमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. शहरातील हॉस्पिटलवर भार वाढल्याने ग्रामीण भागात सोयी देण्याचा प्रयत्न झाला.

शहर हद्दीत सर्वाधिक सुविधा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात संसर्ग वाढला. या काळात रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पिटलमधील बेड व ऑक्सिजनची कमतरता भासली. त्याचबराेबर अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवला. व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडच्या सर्वाधिक सुविधा शहर हद्दीत असल्याने ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्ण शहराकडे येत होते.

 

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अभ्यास करून दुसऱ्या लाटेत दहा टक्के रुग्ण वाढतील, असा अंदाज गृहीत धरून बेडची तयारी करण्यात आली. पण प्रत्यक्षात रुग्ण वाढले. यामुळे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची मागणी वाढल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने शासकीय रुग्णालयाची बेड क्षमता दुपटीने वाढविली. तातडीचे ऑक्सिजनचे शंभर बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभारले. जिल्हा आरोग्य, मनपाचे दवाखाने, विमा व शासकीय रुग्णालयात सुविधा वाढविल्या.

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

ग्रामीणची सरकारी रुग्णालये/कोविड सेंटर

  • आधी:८७
  • नंतर: ११७
  • खासगी रुग्णालये / कोविड सेंटर
  • आधी:१०
  • नंतर : ४६
  • ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्ट
  • आधी: २
  • नंतर: ७
  • आयसीयू बेडची संख्या
  • आधी: ९२३
  • नंतर:१२७९
  • व्हेंटिलेटर
  • आधी: २०३
  • नंतर:३६५

Web Title: Corona opens eyes, increases ICU, oxygen, ventilator beds in Ansolapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.