सोलापूर ग्रामीणमध्येही घटले कोरोनाचे रुग्ण; ४२ हजार २९६ जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:03 IST2020-12-02T13:03:24+5:302020-12-02T13:03:47+5:30
अद्यापही ४३६ जण रुग्णालयात आहेत; मृतांची एकूण संख्या ५६२ झाली

सोलापूर ग्रामीणमध्येही घटले कोरोनाचे रुग्ण; ४२ हजार २९६ जणांनी केली कोरोनावर मात
सोलापूर : शहरासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०८० चाचण्यांमधून ११५ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून २१३ जणांनी कोरोनावर मात केल्याचे मंगळवारच्या अहवालातून स्पष्ट झाले.
महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत केलेल्या ७०५ चाचण्यांमधून १९ रुग्ण आढळून आले. १३ जणांनी कोरोनावर मात केली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती जुनी लक्ष्मी चाळ डोणगाव परिसरातील ६४ वर्षीय पुरुष आहे. शहरात अद्यापही १०९ जण होम क्वारंटाईन आहेत तर ६८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत. ४३ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात १३७५ चाचण्यांमधून ९६ रुग्ण आढळून आले. २०० जणांनी कोरोनावर मात केली. मरण पावलेली व्यक्ती भारत गल्ली, अक्कलकोट येथील ७८ वर्षीय पुरुष आहे. ग्रामीण भागात अद्यापही १२ हजार ९ जण होम क्वारंटाईन तर ३०८६ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत.
जिल्ह्यातील ४२ हजार २९६ जणांनी केली कोरोनावर मात
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५७८ झाली आहे. यापैकी ३२ हजार ८८८ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही १६४९ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १०४१ झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या १० हजार ४०६ झाली. यापैकी ९ हजार ४०८ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ४३६ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या ५६२ झाली आहे.