कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वॉजा पीर सैफुलमुल्कची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:33 IST2021-01-01T12:32:40+5:302021-01-01T12:33:32+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Corona cancels Khwaja Peer Saifulmulk's visit to Hyderabad | कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वॉजा पीर सैफुलमुल्कची यात्रा रद्द

कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वॉजा पीर सैफुलमुल्कची यात्रा रद्द

सोलापूर : कोरोनामुळे हैद्रा (ता. अक्कलकोट) येथील ख्वॉजा पीर सैफुलमुल्क दर्गाह मस्जिद व कब्रस्थान वक्फनिमित्त दरवर्षीप्रमाणे होणारी यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय दर्गाह समितीच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मिरासाब याकुबसाब मुजावर (मुतवल्ली) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी न होता साध्या पद्धतीने यात्रा साजरी होणार आहे. ९ जानेवारी रोजी संदल मिरवणूक, १० जानेवारी रोजी चिराग, तर ११ जानेवारी रोजी जियारत (महाप्रसाद वाटप) चा कार्यक्रम होणार आहे. अगदी साध्या व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात येणार आहेत. यात्राकाळात देवस्थान (दर्गाह) चे प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे भक्तांनी यात्राकाळात मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये, असेही आवाहन मुतवल्ली मिरासाब मुजावर यांनी केले आहे.

दरम्यान, यात्रा कालावधीत देवस्थानच्या वतीने शासनाने दिलेल्या कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येणार आहे. शक्यतो भाविकांनी यात्रा कालावधीत हैद्रा येथे येण्यास टाळावे, असेही आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रफीक मुजावर, सेक्रेटरी बंदेनवाज मुजावर, अहमद मुजावर, वकील मुजावर, याकुब मुजावर, अब्दुलरौफ मुजावर, बंदेनवाज मुजावर उपस्थित होते.

 

Web Title: Corona cancels Khwaja Peer Saifulmulk's visit to Hyderabad