सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी दीक्षांत समारंभ; १२ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 13:26 IST2022-01-07T13:26:52+5:302022-01-07T13:26:57+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ; 62 पीएच.डी पदवी तर 55 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी दीक्षांत समारंभ; १२ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. 11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी एकूण 12 हजार 239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 62 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 55 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. कोविड विषाणूमुळे शासनाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपस्थित राहूनच पदवी ग्रहण करावे लागणार आहे. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यंदा 62 जणांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी पदवी प्राप्त करण्यामध्ये 38 मुले तर 24 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 55 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 55 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 16 मुले तर 39 मुलींचा समावेश आहे.
राज्यपालांच्या हस्ते बारा जणांना सन्मान
महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आयोजित 17 व्या दीक्षांत समारंभात 8 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना तर 4 पीएचडी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चारही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सर्व नियमांचे पालन 50 व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन व https://youtu.be/pSobXUz-V5o या युट्युब लिंकवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पदवी संपादन करीत असल्याचे यावेळी राज्यपाल श्री कोश्यारी हे जाहीर करणार आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातून नंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदी उपस्थित होते.