सणासुदीत आक्षेपार्ह पोस्टवर 'सायबर'ची करडी नजर, नागरिकांना केलंय आवाहन
By रवींद्र देशमुख | Updated: September 15, 2023 18:49 IST2023-09-15T18:49:07+5:302023-09-15T18:49:49+5:30
सोलापूर शहर सायबर पोलिस यावर लक्ष ठेवून असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल गज्जा यांनी सांगितले.

सणासुदीत आक्षेपार्ह पोस्टवर 'सायबर'ची करडी नजर, नागरिकांना केलंय आवाहन
रवींद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर : आगामी काळ हा सणासुदीचा आहे. गौरी-गणपती, गणेशोत्सव, ईद ए मिलाद असा हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्सव आहे. या काळात शांतता-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व समाजातील बांधवांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह चित्र अथवा पोस्ट टाकू नये, यावर सायबर पोलिस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. अशा कृती आढळून आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून महिनाभरापासून सर्वच मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी जोरदार तयारीत आहेत. लेझीम, झांज, टिपऱ्य, देखावे अशा कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. याच काळात गौरी आवाहनही आहे. बाजारपेठेत रेलचेल सुरू आहे. ईद ए मिलाद हासुद्धा याच काळात आहे. सर्व समाजबांधव आनंदात आहेत. अशावेळी कोणाच्या भावना दुखावणार नाही असे कृत्य कोणीही करू नये. उत्साहाच्या भरात उचलले जाणारे एखादे पाऊल धार्मिक तेढ निर्माण करणारे ठरू नये, यासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत कोणीही आक्षेपार्ह चित्र किंवा चलचित्र सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही, व्हाॅट्सॲप स्टेट्स ठेवणार नाही किंवा एकमेकांना शेअर करणार नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला जाणार नाही. जर असे काही आढळून आल्यास पोलिस कारवाई करेल. सोलापूर शहर सायबर पोलिस यावर लक्ष ठेवून असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल गज्जा यांनी सांगितले.
शहराची शांतता टिकून राहावी, यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सायबर यंत्रणेतील पथक सज्ज आहे. आक्षेपार्ह पोस्ट, चित्र, व्हिडीओ याद्वारे मूठभर विघातक शक्तींचे कृत्य शहराचे स्वास्थ्य बिघडवून टाकते. याची सर्वसामान्य घटकाला झळ पोहोचते. अशा घटना उघडकीस आल्यास गंभीर कारवाई होईल.
- श्रीशैल गज्जा, पोलिस निरीक्षक, सायबर सेल
आनंदी राहा, आनंदी ठेवा...
उत्सव सर्वच समाजाचा आहे. यामुळे उत्सवात आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवून उत्सव साजरा करावा. सोलापूर शहराला उत्सवाची परंपरा आहे. त्याला गालबोट लागू देऊ नका, असे आवाहनही पोलिस आयुक्तांनी परवाच्या शांतता कमिटीच्या बैठकीत सूचित केले आहे, असेही सायबर पोलिसांनी सांगितले.