पांडुरंगाच्या पंढरी नगरीत वारकरी वेशात पोलिसांनी केले नागरिकांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:39 IST2020-03-31T13:36:47+5:302020-03-31T13:39:01+5:30
संचारबंदीची अंमलबजावणी न करणाऱ्यांना नागरिकांना पोलिसांनी लावला बुक्का..

पांडुरंगाच्या पंढरी नगरीत वारकरी वेशात पोलिसांनी केले नागरिकांचे प्रबोधन
पंढरपूर : नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र पंढरपुरातील नागरिक आजही रस्त्यावर मुक्तपणे संचार करत आहेत. संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करत आहेत. अनेक उपाययोजना करून देखील नागरिकांचे प्रबोधन होत नसल्याचे दिसून आले.
यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी वारकरी वेशामध्ये पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील, हरी औटी व पोलीस नाईक अभिजीत कांबळे या पोलिसांची नेमणूक केली. व त्या वारकरी वेशातील पोलिसांच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचे, अभंग म्हणून कुंकू बुक्का लावून प्रबोधन करण्याचे काम सुरू केले आहे.