सोलापूरच्या बालगृहातील मुलांना शाळेतून पळवले; पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: December 5, 2023 17:28 IST2023-12-05T17:26:31+5:302023-12-05T17:28:16+5:30
या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू आहे.

सोलापूरच्या बालगृहातील मुलांना शाळेतून पळवले; पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
सोलापूर : येथील बालगृहात राहणाऱ्या पाच मुलांना शाळेतून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार सुरक्षा रक्षक विजयकुमार मधुकर शिंदे (वय- ४८, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना कॅम्प शाळा क्र. १ परिसरातून सोमवारी सकाळी ११:३० ते ५:३० या वेळेत घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानुसार मंगळवारी अपहरणाचा गुन्हा नोंदला आहे. कार्तिक सयाजी पाटील (वय- १६), तुषार महेश, अजय शरणप्पा झुरळे (वय- १५), अर्जुन (वय- १३), ऋतिक चंद्रकांत चौगुले (वय- १२, सर्व रा. निरीक्षण गृह/बालगृह उत्तर सदर बझार) अशी पळवून नेलेल्या मुलांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे बालगृहात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.
बालगृहात वास्तव्यास असलेले मुले सोलापूर महानगर पालिकेच्या कॅम्प शाळा क्र. १ मध्ये शिक्षण घेताता नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ते शाळेत गेले. सायंकाळी ते बालगृहात परतले नाहीत. या मुलांना अज्ञात इसमाने फूस लावून बालगृहाच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले असल्याचे सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.