गादेगाव येथे होणारा बालविवाह रोखला; मुलीच्या कुटुंबाचे केले मनपरिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:39 IST2020-12-28T17:39:21+5:302020-12-28T17:39:58+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

गादेगाव येथे होणारा बालविवाह रोखला; मुलीच्या कुटुंबाचे केले मनपरिवर्तन
पंढरपूर : गादेगाव (ता.पंढरपूर) येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्याचे काम पंढरपूर पोलिसांनी रविवारी केले आहे. मुलीच्या कुटुंबाचे मनपरिवर्तन करून हमीपत्र घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
गादेगाव (ता.पंढरपूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती निर्भया पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गाडेकर यांना मिळाली.
निर्भया पथकाने तत्काळ त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून मुलीच्या वयाबाबत खात्री केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्या मुलीस तिच्या आईसोबत ताब्यात घेवून पंढरपूर शहर पोलिस ठाणे निर्भया पथक पंढरपूर येथे तज्ञांकडून समुपदेशन करून बालविवाह करणे कायदेशीर रित्या गुन्हा असल्याचे समजावून सांगितले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
पोलिस पाटील ठेवणार लक्ष
हा बालविवाह न करता मुलीची १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर करण्याबाबत हमीपत्र लिहुन घेवून गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या मार्फतीने मुलींच्या कुटुंबांचे मनपरिवर्तन केले. तसेच तिसंगी व गादेगाव येथील पोलिस पाटील यांना या कुटुंबियांवर लक्ष ठेवण्याबाबत लेखी समजपत्र व सुचना दिल्या पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले.