छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे
By राकेश कदम | Updated: October 5, 2023 18:23 IST2023-10-05T18:22:57+5:302023-10-05T18:23:39+5:30
सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.

छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे
सोलापूर : छगन भुजबळ यांनी सत्तेचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करू नये. त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये, असा इशारा मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सोलापुरातील जाहीर सभेत दिला. सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.
जरांगे पाटील म्हणाले, आजवर आम्ही कोणत्याही नेत्याच्या बोलणे टाळत होतो. पण एकाने छत्रपती संभाजीनगरात आमची जाहीर सभा होऊ देणार नाही असे म्हटले. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे करत आहात का? असा सवाल ही जरांगे पाटील यांनी केला.
ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द काढू नये. आमच्या अनेक पिढ्यांनी तुमच्यावर गुलाल टाकण्याचे काम केले. त्यांचा अवमान होईल असे वागू नका. मला डिवचू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये. पोरं आत्महत्या करणार असतील तर आरक्षण कुणाला द्यायचं आणि कुणासाठी घ्यायचं असा सवालही त्यांनी केला.