स्मशानभूमीलाच आपलं घर मानलं; ती माय ढासळलेली चिता रचते, खड्डेही खणते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 12:12 IST2021-03-08T12:12:25+5:302021-03-08T12:12:32+5:30
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : अंत्यविधीला स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तर प्रत्येकजण तिथून लगेच काढता पाय घेतात पण नागूबाई भगवान ...

स्मशानभूमीलाच आपलं घर मानलं; ती माय ढासळलेली चिता रचते, खड्डेही खणते !
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : अंत्यविधीला स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तर प्रत्येकजण तिथून लगेच काढता पाय घेतात पण नागूबाई भगवान डोलारे या ७० वर्षीय महिलेने स्मशानभूमीलाच आपलं घर मानलं. काळोख, अंधाराला सोबती करीत नागूबाई मोदी स्मशानभूमीत ढासाळलेली चिता रचते अन् दफनविधीसाठी थडगंही खणून आपली सेवा बजावते. कोरोनाच्या संकटातही महापालिका प्रशासनाला त्यांचा खूप मोठा आधार मिळाला.
नागूबाई यांचे माहेर कर्नाटकातील रायचूर येथील. सोलापुरातील मोदी भागात राहणाऱ्या भगवान डोलारे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. स्मशानभूमीतच त्यांचा संसार असेल असे नागूबाईंना वाटलेही नव्हते. एकीकडे पती स्मशानभूमीत सेवा बजावताना दुसरीकडे नागूबाई घाबरल्याच. पतीने धीर दिला म्हणून त्यांची मानसिकता बदलत गेली. दरम्यान, पती भगवानचे निधन झाल्यानंतर चार मुलं आणि दोन मुलींबरोबर त्यांनी नेटाने पतीच्या सेवेची परंपरा राखली. आज त्यांची दोन मुलं देवाघरी गेली असली तर राजू आणि कुमार ही दोन मुलंही आईच्या स्मशानसेवेला हातभार लावत आहेत. नागूबाईच्या मदतीला भावजय शांताबाई सगले याही स्मशानात दिवस काढत सेवेला बळकटी देत आहेत.
कोरोना वॉरियर्स म्हणून सेवा
एप्रिलनंतर सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. कोरोनाने मरण पावलेल्यांची प्रेतं एकापाठोपाठ दहनासाठी स्मशानभूमीत येत होते. त्याला वेळ काळ नव्हता. मुलगा राजूला सोबत घेऊन नागूबाई विद्युत दाहिनीत तळ ठोकून असायच्या. काळोख, अंधारात फिरणारे विषारी सापांची तमाही त्यांनी कधी बाळगली नाही. सापांची अन् आमच्या कुटुंबातील सदस्यांचे एक नातं असावं. म्हणूनच आमच्या वासानं हे साप आमच्या जवळही कधी आले नाहीत. कोरोनाच्या संकटात नागूबाई यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून आपली छाप सोडली.
पदर खोचून कामाला लागतात..
मोदी स्मशानभूमीतच घर असलेल्या नागूबाई घरातील सदस्यांच्या अनुपस्थितीत स्वत: थडगंही खणतात. ५ बाय ५ चं ४ फूट थडगं खणण्यासाठी दोन-अडीच तास लागतात. हे काम करतानाही त्यांनी श्रमपूजा असल्याचे सांगतात.
महापालिकेने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष घातले पाहिजे. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही माझी भावना आहे. भविष्यात ही स्मशानभूमी नंदनवन झाली पाहिजे.
- नागूबाई डोलारे