पाणीचोरी पकडणाऱ्या कालवा निरीक्षकाला शेतकऱ्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:25 AM2020-04-29T11:25:06+5:302020-04-29T11:27:30+5:30
चिकमहूद येथील घटना; संबंधित शेतकऱ्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगोला : महूद - राजेवाडी कालवा क्र. २ वर अनाधिकृतरित्या टाकलेले सायपन जेसीबीने काढत असताना चिडलेल्या शेतकऱ्याने तुम्ही कालव्यावरील माझे सायपन का काढले असे म्हणून शिवीगाळी करीत गच्ची पकडून कालवा निरीक्षकाच्या श्रीमुखात लगावली. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास जाधववाडी ( चिक-महूद ता. सांगोला ) येथील कालवा क्र.२ वरील दार क्र. ४० जवळ घडली.
याबाबत राजेवाडी कालवा निरीक्षक दत्तात्रय गणपत भाले (रा. बलवडी ता. सांगोला) यांनी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी भाऊराव भीमराव जाधव (रा. जाधववाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेवाडी तलावातून उन्हाळी हंगामातील शेती व फळ पिकांसाठी कालव्यातून लाभ क्षेत्रात आर्वतन सोडले आहे. दरम्यान चिकमहुद -जाधववाडी येथील भाऊराव जाधव यांनी हद्दीतून जाणाऱ्या कालवा क्र. २ वरील दार क्र. ४० वर सायपन टाकून पाण्याची चोरी केल्याचे कालवा निरीक्षक दत्तात्रय भाले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जेसीबीच्या साह्याने अनाधिकृतरित्या टाकलेले पाईप ( सायपन ) काढून टाकण्याचे शासकीय काम करीत असताना भाऊराव जाधव यांनी त्याठिकाणी येऊन तुम्ही कालव्यावरील माझे सायपन का काढून टाकले असे म्हणून कालवा निरीक्षक भाले यांना शिवीगाळी करून गच्ची पकडून त्यांच्या गालावर चापट मारून मुक्कामार दिल्याने ते जखमी झाले. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश पाटोळे करीत आहेत.
नीरा उजवा कालवा मैल ९३ खाली व राजेवाडी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, अशावेळी शेतकरी अनधिकृत पणे कालव्यावर सायपन टाकून पाण्याची चोरी करीत आहेत. पाटबंधारे अधिकारी अशा लोकांना पाण्याची चोरी करू नका म्हणून विरोध करीत असताना शेतक-याकडून अधिकाऱ्यावर हल्ले होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.