दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्यानं आले; सासू-सुनास पावणेदोन लाखाला गंडवले
By विलास जळकोटकर | Updated: January 9, 2024 19:48 IST2024-01-09T19:47:52+5:302024-01-09T19:48:05+5:30
या प्रकरणी फसवणुकीची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली.

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्यानं आले; सासू-सुनास पावणेदोन लाखाला गंडवले
सोलापूर: घरासमोर अंगणात भांडी घासत बसलेल्या सासु-सुनास दागिने पॉलिश करतो अशा बहाण्यानं आले अन् हातचलाखी करुन १ लाख ६० हजारांचे दागिने स्वत:कडे ठेवले, पिशवीन दगड ठेवून गंडवून गेले. फिल्मीस्टाईल फसवणूक उत्तर सदर बझार येथील वीणकर सोसायटीत दिवसाढवळ्या दुपारच्यावेळी घडली. या प्रकरणी सावित्री नागनाथ बोगा यांनी फसवणुकीची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली.
फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी ११३० ते १२ च्या दरम्यान २५ ते ३५ वयोगटातील तरुण फिर्यादीच्या अंगणात आले. त्यांनी दागिने पॉलिश करुन चकाचक करुन देतो असे आमिष दाखवले. यावर फिर्यादी व त्यांची सून दोघीही भाळल्या. भांडी घासता घासता त्यांनी दागिने आणून दिले.
दागिने पॉलिश करण्याचा बहाणा करीत दोघांनी सोन्याचं गंठण, मंगळसूत्र, कर्णफुले नजर चुकवून स्वत:कडे ठेवले. प्लॉस्टिक पिशवीत कागदामध्ये लहान दगड ठेवून घाईघाईने निघून गेले. थोड्या वेळांनी त्यांनी पिवशी उघडून पाहिली असता दागिन्याऐवजी त्यात दगड दिसून आले.
त्यांनी सदर बझार पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक झाली असून, १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची फिर्याद नोंदविली. या प्रकरणी तपास फौजदार माळी करीत आहेत.