ग्रामीण कोरोना मृतांवर शहरातच दहन; स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:29 IST2020-09-14T13:26:58+5:302020-09-14T13:29:04+5:30
किमान बारा तासांची प्रतीक्षा : शववाहिका, लाकूड, गोवºया मिळण्यातही अडचण

ग्रामीण कोरोना मृतांवर शहरातच दहन; स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग
राकेश कदम
सोलापूर : ग्रामीण भागातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीत आणखी एका विद्युत दाहिनीचे तर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरात मे, जून आणि जुलै महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. दररोज सरासरी सहा ते सात लोकांचा मृत्यू व्हायचा. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. अंत्यसंस्कारासाठी दोन- दोन दिवस लागत होते. आॅगस्ट महिन्यात शहरातील कोरोना नियंत्रणात आला; मात्र ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मरण पावलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या ताब्यात देण्यात येते.
महापालिकेचे कर्मचारी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील लोक शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोदी स्मशानभूमी, रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेह दहनाला वेळ लागत आहे. लाकडे, गोवºया वेळेवर मिळत नाही. पावसाच्या दिवसांमुळे मृतदेहाचे दहन होण्यासही विलंब लागत असल्याचे मोदी स्मशानभूमीतील राजू डोलारे यांनी सांगितले.
आजही लागतात १२ तास
कोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला आहे. सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातात. जून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे. आता एखाद्या मृत व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असेल तर मृतदेह बाजूला ठेवला जातो. परंतु सकाळी मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आजही किमान १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे लादेन शेख यांनी सांगितले.