लातूरच्या ब्रेनडेड गुरुजींचं सोलापुरात अवयवदान: लिव्हर, डोळे, किडनी केले दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:11 IST2025-01-27T14:11:35+5:302025-01-27T14:11:54+5:30
लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

लातूरच्या ब्रेनडेड गुरुजींचं सोलापुरात अवयवदान: लिव्हर, डोळे, किडनी केले दान
सोलापूर : विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकावर अपघाताचं अकाली संकट ओढावलं. अथक प्रयत्न करूनही रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या उपचारादरम्यान ब्रेनडेड (मेंदू मृत) झाल्याचं निदान झालं. कुटुंबीयांनी ओढावलेल्या संकटाला धिरानं तोंड देत अवयवदानाचा निर्धार केला. शनिवारी ब्रेनडेड शिक्षक विठ्ठल गंगाधर भुरके (वय ३८) यांच्या नातेवाईकांनी अवयवदानास मान्यता दिली. सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया पार पडली. त्यांचे लिव्हर, दोन किडनी, डोळे दान केले. लातूर येथील जयभवानी माध्यमिक विद्यालय सुगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक विठ्ठल गंगाधर भुरके (वय ३८, मूळ कुसळवाडी, ता. हादगाव, जि. नांदेड) यांचा लातूर येथे अंबाजोगाई रोडवर मोटारसायकलचा अपघात झाला होता. लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यादरम्यान डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांचा ब्रेनडेड झाल्याचं सांगितले.
यावेळी कुटुंबीयांशी चचर्चा केल्यानंतर त्यांच्या पत्नी, भाऊ व भाचे यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या पत्नी अरुणा भुरके, वडील गंगाधर भुरके, लहान भाऊ लिंबाजी भुरके, भाचे डॉ. मंगेश डुकरे यांनी धाडस करून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातूनही कौतुक केले जात आहे
कोणाचातरी जीव वाचणार
अवयवदानाची सर्व प्रक्रिया यशोदारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली पार पडली. आपला व्यक्ती गेला तरी त्यांच्या अवयवाचा इतर रुग्णांना फायदा होईल, असे ब्रेनडेड विठ्ठल भुरके यांच्या पत्नी अरुणा भुरकेंसह त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. यावेळी यशोधरा हॉस्पिटलचे डॉ. शिवपुजे व त्यांचा सर्व स्टाफ यांनी मृत भुरके यांच्या कुटुंबीयांचे अवयवदानाच्या धाडसी निर्णयाबद्दल आभार मानले.
जनजागृतीची गरज
यावेळी बोलताना नांदेड येथील डेल्टा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बळीराम भुरके यांनी आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती अवयवदान करत आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती अवयवाच्या माध्यमातून जिवंत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. वैद्यकीय क्षेत्रात अवयवदानाबद्दल जनजागृती होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.