बोगस बांधकाम नोंदणीचा होणार पर्दाफाश; दलाल, संघटनांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

By Appasaheb.patil | Published: January 1, 2021 12:20 PM2021-01-01T12:20:42+5:302021-01-01T12:21:06+5:30

सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दलालांवर टांगती तलवार

Bogus construction registration will be exposed- action is being taken against brokers and associations | बोगस बांधकाम नोंदणीचा होणार पर्दाफाश; दलाल, संघटनांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

बोगस बांधकाम नोंदणीचा होणार पर्दाफाश; दलाल, संघटनांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

googlenewsNext

सोलापूर : इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे ३२ योजनांचा लाभ मिळतो. याच योजनांच्या लाभावर डोळा ठेवून नोंदणीच्या अटी व नियमातील पळवाटांचा आधार घेत सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणारे दलाल व संघटना यांचेवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी ही कामगाराने स्वतः दिलेल्या हमीपत्राच्या आधारे केली जाते. याचाच गैरफायदा घेत काही दलाल व कथित कामगार संघटना या मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याने सहायक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे यांनी आता अशा दलाल व संघटनांवर कारवाईचा फास आवळला आहे. शहर व जिल्ह्य़ातील सुमारे ४५ ठेकेदार व संघटनांना येलगुंडे यांनी नोटिसा बजावल्याचे सांगण्यात आले. यातील बहुतांश ठेकेदारांनी मोठ्या संख्येने कामगार आपल्याकडे कामाला असल्याचे शिक्के कामगारांना दिले आहेत. आता या कामगारांचे वेतनपत्रक, हजेरीपट इत्यादी सर्व रेकॉर्ड सादर करावे असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे बोगस कामगार नोंदीत केलेले दलाल व संघटना यांचे धाबे दणाणले आहेत.

 

काही ठेकेदार व संघटना कोणत्याच प्रकारचे रेकॉर्ड सादर करू न शकल्याने आता या कामगारांची नोंदणी रद्द करून ठेकेदारांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहायक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे यांनी मात्र याबाबत अधिक काही बोलण्यास नकार दिला. कारवाई अद्याप सुरू असल्याने आताच काही बोलणे उचित होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

शासकीय कर्मचारी संघटनेची तक्रार

बोगस बांधकाम कामगार नोंदीत करणारे दलाल व ठेकेदार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याने त्यातील काहींनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातीलच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उलटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हे अधिकारी व कर्मचारीच बोगस नोंदणी करतात असा कांगावा आता केला जात आहे. मात्र कामगार देत असलेले हमीपत्राच्या आधारेच नोंदणी होते. त्यामुळे यात आमचा कोणताही दोष नसताना आमच्यावर निराधार आरोप करून आमची छळवणूक केली जात असल्याची तक्रार कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी संघटनेने केली आहे.  तर दुसरीकडे नोटीसमुळे अडचणीत आलेल्या एका कामगार संघटनेने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

जिल्हाधिका-यांनी बोलाविली बैठक

जिल्हाधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला एका बैठकीचेदेखील आयोजन केले आहे. या बैठकीबद्दल विचारले असता सहायक कामगार आयुक्तांनी अशी बैठक असल्याचे मान्य केले. मात्र त्याबाबत अधिक बोलणे टाळले. या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे; परंतु यापुढील काळात बोगस नोंदणी करणारे दलाल व संघटनांची खैर नाही हे मात्र आता स्पष्ट होत आहे.

 

Web Title: Bogus construction registration will be exposed- action is being taken against brokers and associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.